लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीमध्ये भाजपनं सर्वाधिक 131 जागा जिंकल्या, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळालं. मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला. महाविकास आघाडीतील तीन पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या.
दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी देखील भाजप नेत्याचीच वर्णी लागली, राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष बनले, त्यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्षपद कोणाला मिळणार? शिवसेनेला की राष्ट्रवादी अजित पवार गटाला? याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे अपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे, या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीला धनंजय मुंडे देखील हजर आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इतरही काही विषयांवर चर्चा होणार आहे.