मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील (WPL 2025) तिसऱ्या हंगामातील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने एलिमिनेटर सामन्यामध्ये गुजरात जायंट्सवर 47 धावांनी मात केली. मुंबईने गुजरातला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 19.2 ओव्हरमध्ये 166 धावांवर गुंडाळलं. मुंबईने अशाप्रकारे विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. आता अंतिम फेरीत मुंबईचा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध शनिवारी 15 मार्च रोजी होणार आहे.
गुजरातची बॅटिंग
गुजरातकडून काही अपवाद वगळता फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना वेळीच रोखलं आणि सामन्यावर शेवटपर्यंत घट्ट पकड ठेवली. गुजरातसाठी डॅनियल गिब्सन हीने सर्वाधिक 34 धावा केल्या. तसेच फोबी लिचफिल्ड हीने 31, भारती फुलमाळी हीने 30 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. मुंबईसाठी हॅली मॅथ्यूज हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अमेलिया केर हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तर शबनिम इस्माईल आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत गुजरातला गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगला बोलावलं. मुंबईने 4 विकेट्स गमावून 213 धावा केल्या. मुंबईसाठी नॅट सायव्हर ब्रँट आणि हेली मॅथ्यूज या दोघींनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. नॅटने 41 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्ससह 77 रन्स केल्या. तर हेलीने 50 चेंडूत 10 चौकार आणि 3 सिक्ससह 77 धावांची खेळी केली. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने अखेरच्या क्षणी 12 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 36 रन्स केल्या. यास्तिका भाटीया हीने 15 धावांचं योगदान दिलं. तर सजीवन सजनाने 1 धावेवर नाबाद परतली. डॅनियल गिब्सन हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर काश्वी गौतम हीने 1 विकेट घेतली.
मुंबईची फायनलमध्ये धडक
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजाना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि सायका इशाक.
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन : ॲश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (विकेटकीपर), काशवी गौतम, हरलीन देओल, फोबी लिचफिल्ड, डॅनियल गिब्सन, भारती फुलमाली, सिमरन शेख, मेघना सिंग, तनुजा कंवर आणि प्रिया मिश्रा.