पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 25 भारतीय नागरिक तर 1 नेपाळी नागरिकांचा समावेश होता. भारतानं या हल्ल्याचा बदला घेतला आहे. मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील चार तर पीओकेमधील पाच दहशवादी अड्डे भारतानं उद्ध्वस्त केले आहेत, या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.
याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा धमकीचा मेल पाकिस्तानातून करण्यात आला आहे, या मेलमध्ये स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे देशातील सर्वात मोठं स्टेडियम आहे, दरम्यान धमकीचा मेल आल्यानंतर आता पोलीस अलर्ट मोडमध्ये आले असून, पोलिसांकडून धमकीच्या ई-मेलबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त
पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतला आहे, मध्यरात्री पाकिस्तान आणि पीओकेवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओकेमधील 5 तर पाकिस्तानमधील चार दहशतवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली आहेत, या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र पाकिस्तान उलट्या बोंबा मारत असल्याचं दिसून येत आहे, जिथे एअर स्ट्राईक झाला, तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच असा दावा पाकिस्तानं केला आहे, तसेच आमच्या 26 लोकांचा मृत्यू झाला असून, 46 जण जखमी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. भारतानं आमच्यावर नुसताच हल्ला नाही केला तर आमची मजाक उडवली आहे, आम्ही लक्षात ठेऊ अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये बोलताना दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून पाकिस्तानला भारतासोबत युद्ध न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.