दौंड शहरात मोकाट कुत्री व जनावरे यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि. 16) शहरातील खाटीक गल्ली येथे मुजम्मिल अरबाज कुरेशी (वय 4) हा घराबाहेर खेळत असताना चार ते पाच कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला.
यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले.
दौंड शहरातील मोकाट कुत्री घोळक्याने फिरतात. दुचाकीस्वाराच्या मागे लागतात. मोटारीचाही पाठलाग करतात. रात्रीच्या वेळी कुत्र्यांमुळे धडकी भरते. अनेकदा याबाबत नगरपालिकेला सांगून देखील ठोस उपाययोजना होत नाही. दौंड नगरपालिकेने आतापर्यंत मोकाट जनावरे व कुत्री पकडण्यासाठी जो खर्च केला आहे त्याची चौकशीची मागणी होत आहे. दौंड नगरपालिकेत ठराविक अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे कोणाचेही लक्ष नाही, असा आरोप होत आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.