आईवडिलांची सेवा केली तर मेवा मिळतो असं म्हटलं जातं. प्राचीन काळापासून हेच प्रत्येक पिढीला सांगितलं जातं. पण प्रत्येक पिढीतील सर्वच मुलं ऐकतात कुठे? काही मुलं तर आपल्या आईवडिलांना म्हातारपणात नको नको करून सोडतात.
परवाचीच गोष्ट, मुंबईत एका व्यक्तीने आज्जीला कॅन्सर झाला म्हणून तिला कचराकुंडीत टाकून दिलं. त्यामुळे सर्वच हादरून गेले होते. तामिळनाडूतही असंच काही घडलंय. मुलींच्या रोजच्या टोमण्यांना वैतागून एका व्यक्तीने थेट मंदिरालाच चार कोटी रुपये दान केले आहेत. त्यामुळे या मुलींवर मोठं आभाळच कोसलळं आहे.
तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील एका 65 वर्षीय निवृत्त सैनिकाने हा निर्णय घेतला. एस. विजयन असं या निवृत्त सैनिकाचं नाव आहे. त्याने मुलींवर नाराज होऊन आपली 4 कोटींची संपत्ती मंदिराला दान केली आहे. माझ्या दैनिक गरजांसाठीही मुलींनी मला सतत टोमणे मारले. माझ्याशी भांडणं केली. त्यामुळेच मी हा निर्णय घेतल्याचं विजयन यांचं म्हणणं आहे. तर ही संपत्ती परत मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी कायदेशीर लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अन् मंदिर प्रशासनाला कळलं
एस. विजयन यांनी काही दिवसांपूर्वी अरुलमिगु रेणुगंबल अम्मन मंदिरात जाऊन आपल्या संपत्तीचे कागदपत्र दान केले. यात एक 3 कोटीची तर दुसरी 1 कोटीची संपत्ती आहे. मंदिरातील कागदपत्रांची छाननी केल्यावर मंदिर प्रशासनाला याची माहिती मिळाली.
दानपेटीत मिळाले कागदपत्र
दर दोन महिन्याला मंदिराची दानपेटी खोलल्या जाते. त्यात भक्तांनी देवाला चढवलेले पैसे, सोनं आणि इतर वस्तू असतात. या सर्वांना उघडून त्याची मोजदाद केली जाते. पण यावेळी नाणी आणि नोटांसोबत संपत्तीची कागदपत्रंही मिळाली. यात 10 सेंट जमीन आणि मंदिराच्या आसपासच्या एक मजली घरांचे कागदपत्रे होती. त्यासोबतच एक चिठ्ठीही लिहिलेली होती.
या ठिकाणी हे पहिल्यांदाच झालं आहे, असं मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम. सिलंबरासन यांनी सांगितलं. दानपत्रात कागदपत्रं टाकल्याने संपत्ती मंदिराची होत नाही. यासाठी दानकर्त्याला कायदेशीररित्या दान रजिस्टर करावं लागतं, असं सिलंबरासन यांनी स्पष्ट केलं.
विजयन तयार
दरम्यान, मी माझी संपत्ती मंदिराच्या नावे कायदेशीररित्या करण्यास तयार आहे. मी दान नोंदणी करायला तयार आहे. त्यासाठी मी मंदिराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करेन. मी माझा निर्णय मागे घेणार नाही. माझ्या मुलांनी माझ्या दैनिक गरजांसाठीही मला टोमणे मारले आहेत. आता हे सहन करण्याच्या पलिकडे गेलं आहे, असं विजयन म्हणाले.
विजयन हे रेणुगंबल अम्मन मंदिराचे भक्त आहेत. पत्नीपासून विभक्त झाल्यापासून ते एकटे राहत आहेत. त्यांच्या मुलींसोबतही त्यांचं पटत नाही. उलट त्यांच्या मुली त्यांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. पण आता विजयन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबाच्या तोंडचं पाणी पळालं आहे. ही संपत्ती परत मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी आता कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण विजयन आपल्या निर्णयावर ठाम असल्याने पेच वाढला आहे.