बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी यशश्री यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केले आहेत. सहकार क्षेत्रातून यशश्री यांचे राजकारणातील हे पहिले पाऊल मानले जात आहे. आतापर्यंत या बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे यंदाही यशश्री यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
निवडणुकीचे अर्ज 14 जुलै रोजी छाननीसाठी घेतले जाणार असून, 15 ते 29 जुलैदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. यानंतरच निवडणुकीचे स्वरूप स्पष्ट होईल. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून, 10 ऑगस्ट रोजी मतदान आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. यापूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन बिनविरोध यश मिळवले होते. यंदाही दोघे एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
17 जागांसाठी 71 अर्ज
सर्वसाधारण मतदारसंघातील 12 जागांसाठी 52 अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी 4 अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती (विमाप्र) च्या एका जागेसाठी 4 अर्ज, इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी एका जागेसाठी 6 अर्ज, आणि महिलांसाठी राखीव दोन जागांसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ यंदा बिनविरोध निवडले जाणार की निवडणूक होणार, याबाबत उत्सुकता आहे.
यशश्री मुंडे: वकिलीपासून राजकारणापर्यंत
यशश्री मुंडे या पेशाने वकील असून, त्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’ म्हणून गौरव प्राप्त केला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. यशश्री यांचे हे राजकीय लॉन्चिंग कसे असेल, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.