शुक्रवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एकामागून एक तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, ज्यामुळे खळबळ उडाली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असल्याचा दावा कॉल करणाऱ्याने केल्याने एकच धावपळ उडाली. या कॉलनंतर, मुंबई पोलिसांचे पथक तत्काळ सतर्क झाले आणि पोलिस अधिकाऱी, तसेच बॉम्ब शोध पथकाने विमानतळ गाठलं. तासन्तास सखोल शोध घेऊन मोहीम राबवण्यात आली, मात्र एअरपोर्टवर कुठेही, काहीच संशयास्पद आढळले नाही
पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. एअरपोर्टचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची, सखोल, बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र पोलिस व बॉम्बशोधक पथकाला कुठेच, काहीही संशयास्पद सापडलं नाही. त्यामुळे बॉम्बची ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हे धमकीचे कॉल आसाम आणि पश्चिम बंगाल सीमेजवळ सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून केले गेले होते. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सध्या, पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचे हेतू शोधता येतीलल यासाठी तपास सुरू आहे.