क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. आशिया कप स्पर्धेचा थरार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. मात्र त्यानंतरही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या स्पर्धेत दोन्ही संघ भिडणार आहेत. भारत-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देश पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 14 सप्टेंबरला खेळवण्यात येऊ शकतो. यंदा टी 20i फॉर्मेटने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
यूएईमध्ये 20 दिवस रंगणार थरार
आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी 26 जुलैला सोशल मीडियाद्वारे आशिया कप स्पर्धेच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या. नकवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईत 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आशिया कप स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेतील संपूर्ण सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाणार, असं नक्वी यांनी म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहमीप्रमाणे यंदाही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही संघात 14 सप्टेंबरला सामना होऊ शकतो. तसेच दोन्ही संघांचा या स्पर्धेत 3 वेळा आमनसामना होण्याची शक्यता आहे. तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघांचा लीग स्टेज आणि सुपर-4 च्या निमित्ताने किमान 2 वेळा आमनासामना होऊ शकतो.
एकूण 6 संघ भिडणार!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येणार आहे. आशिया कप 2023 स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे 6 संघ सहभागी झाले होते.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढला. पाकिस्ताननेही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र भारतीय सैन्याने सर्व हल्ले परतवून लावले. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे बहुतांश व्यवहार बंद केले आणि आर्थिक कोंडी केली. दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. त्यानंतर पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लेजेंड 2025 स्पर्धेतील पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यावर भारताच्या माजी खेळाडूंनी बहिष्कार घातला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान होणार की नाही? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.