महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दहिहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या लाखो गोविंदांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून दहिहंडीच्या सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवादरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या वर्षी, सुमारे १.५० लाख गोविंदांना विमा सरंक्षण देण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दहिहंडीतील गोविंदांसाठी विमा संरक्षणाची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने गोविंदा समन्वय समिती (महा.) च्या माध्यमातून ही योजना लागू केली आहे. यानुसार तब्बल १.५० लाख गोविंदांना “ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी” द्वारे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
मागील वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा कवच देण्यात आले होते. परंतु काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले होते. ही त्रुटी दूर करून यंदा ही मर्यादा वाढवून १.५० लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवले जाणार आहे. या योजनेसाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या विमा कवच योजनेला तात्काळ मंजुरी दिल्याबद्दल राज्यभरातील गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
विमा संरक्षणाचे स्वरूप आणि भरपाई
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या या विमा योजनेत अपघातानुसार वेगवेगळ्या प्रकारची भरपाई दिली जाणार आहे.
मृत्यू झाल्यास: दुर्दैवाने एखाद्या गोविंदाचा दहीहंडीच्या वेळी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई मिळेल.
अपंगत्व: दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात-पाय गमावल्यास देखील १० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.
अंशतः अपंगत्व: एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास ५ लाख रुपयांची भरपाई मिळेल.
वैद्यकीय खर्च: याव्यतिरिक्त, मानवी मनोरे रचताना झालेल्या दुखापतींवर उपचारासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्चही या विमा योजनेत समाविष्ट आहे.
योजनेचे इतर महत्त्वाचे तपशील
या योजनेसाठी “दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई” या कंपनीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे. या विम्याचा संपूर्ण प्रीमियम राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून गोविंदा पथकांची नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे सादर केली जातील. त्यानंतर विमा रकमेचा खर्च शासन अदा करणार आहे. यंदा दहीहंडी उत्सव १६ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.