वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात जुलै महिन्यात इतिहास घडवला. भारतीय महिला संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरात टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत लोळवलं. उभयसंघात 28 जून ते 22 जुलै दरम्यान 5 टी 20i आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. भारताच्या महिला ब्रिगेडने या दोन्ही मालिका जिंकत इंग्लंडचा धुव्वा उडवला. भारताने 5 टी 20i सामन्यांची मालिका 3-2 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर 3 पैकी 2 सामने जिंकत 2-1 अशा फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली. भारताने यासह इंग्लंड दौऱ्याची विजयाने सांगता केली. मात्र त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वूमन्स इंडिया ए टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वूमन्स इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स ए यांच्यात 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान टी 20i मालिकेचं मॅकेमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. भारताला या मालिकेत विजयी सलामी देण्यात अपयश आलं. भारताचा या सामन्यात अवघ्या 13 धावांनी पराभव झाला. यासह ऑस्ट्रेलिया ए वूमन्सने विजयी सलामी देत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर या सामन्यात 138 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानेही जोरदार झुंज देत या आव्हानाजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात भारतीय संघ 13 धावांनी अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने भारताला 124 धावांवर रोखलं. भारताच्या पराभवामुळे प्रेमा रावतची कामगिरी व्यर्थ गेली. प्रेमाने या सामन्यात अप्रतिम बॉलिंग केली. मात्र अनिका लेरॉयड हीच्या अर्धशतकी खेळीसमोर प्रेमाची मेहनत वाया गेली.
भारताची गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. ओपनर ताहिला विल्सन हीने 17 तर एलिसा हिली 27 धावा केल्या. भारताने झटपट 2 झटके दिल्याने ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर गेली. मात्र अनिका लेरॉयड हीने 44 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकलं. तर भारतासाठी प्रेमा रावत हीने 4 ओव्हरमध्ये 15 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या.
भारताची निराशाजनक फलंदाजी
दरम्यान त्याआधी भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने निराशा केली. शफाली वर्मा हीने अवघ्या 3 धावा केल्या. धारा गुज्जर हीला 20 चेंडूत 7 धावाच जोडता आल्या. दिनेश वृंदा हीने 5 धावा केल्या. उमा छेत्री हीने बॉल टु बॉल 31 रन्स केल्या. राघवी बिष्ठ हीने 20 बॉलमध्ये 33 तर कर्णधार राधा यादव हीने 22 चेंडूत 26 धावा केल्या. राघवी आणि राधा या जोडीने झुंज देत भारताला विजयी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात भारताला अपयश आलं. ऑस्ट्रेलियासठी एमी एगर आणि सियाना जिंजर या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर टेस फ्लिंटॉफने 1 विकेट मिळवली.