मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचा अखेर साखरपुडा झाला आहे. साखरपुडा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी हिच्यासोबत त्याचा साखरपुडा झाला. हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड क्षेत्रात प्रसिद्ध आहे, त्यांच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि आइस्क्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरी आहे. सानिया मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबांपैकी एक आहे आणि सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही.अर्जुन तेंडुलकर सध्या 25 वर्षांचा असून भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. असं असताना त्याचा साखरपुडा उरकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या या बातमीने क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. पण तेंडुलकर किंवा घई कुटुंबाने या साखरपुड्याबद्दल अधिकृत असं काहीच सांगितलं नाही.
अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघात आहे. मात्र त्याला फार काही खेळण्याची संधी मिळाली नाही. मागच्या पर्वात तर संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसून राहिला. मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात त्याच्यासाठी 30 लाखांची बोली लावली आणि संघात घेतलं. पण इतर फ्रेंचायझींनी त्याला संघात घेण्यात फार काही रस दाखवला नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
अर्जुन तेंडुलकरने 17 फर्स्ट क्लास, 18 लिस्ट ए आणि 24 टी20 सामने खेळले आहेत. अर्जुनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 33.51 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. तर 23.13 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहे. दुसरीकडे, लिस्ट ए क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरने 25 विकेट घेतल्या आहे. यावेळी त्याची सरासरी ही 31.2 इतकी आहे. तर 17 च्या सरासरीने 102 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 25.07 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या. तसेच 13.22 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत.