वूमन्स इंडिया ए टीमने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. ऑस्ट्रेलिया वूमन्स ए टीमने भारताला टी 20i मालिकेत 3-0 अशा फरकाने पराभूत करत क्लिन स्वीप केलं. मात्र त्यानंतर भारताने 13 ऑगस्टला कांगारुंवर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे ब्रिस्बेनमध्ये करण्यात आलं होतं.
ऑस्ट्रेलियाने भारताला 215 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने राधा यादव हीच्या नेतृत्वात हे आव्हान 48 चेंडूंआधी 3 विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. भारताने 42 ओव्हरमध्ये 5.12 च्या रनरेटने 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. भारताच्या विजयात यास्तिका भाटीया हीने प्रमुख भूमिका बजावली. यास्तिकाने अर्धशतकी खेळी केली. तसेच शफाली वर्मा, धारा गुज्जर, राघबी बिष्ट आणि कर्णधार राधा यादव चौघींनीही योगदान दिलं.
इंडिया ए टीमची बॅटिंग
यास्तिका भाटीया आणि शफाली वर्मा या जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. या जोडीने 77 धावांची सलामी भागीदारी केली. भारताने शफालीच्या रुपात पहिली विकेट गमावली. शफालीने 31 बॉलमध्ये 5 फोरसह 36 रन्स केल्या. त्यानंतर धारा गुजर आणि यास्तिका भाटीया या जोडीनेही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघींनी 78 बॉलमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने भारताच्या विजयाचा दावा आणखी मजबूत केला.
धारा गुजर 31 धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताने यास्तिका भाटीयाच्या रुपात तिसरी विकेट गमावली. यास्तिका भाटीया हीने 70 बॉलमध्ये 7 फोरसह 59 रन्स केल्या. राघवी बिष्ठने 25 तर राधा यादव हीने 19 धावांचं योगदान दिलं. तसेच इतरांनीही धावा करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं.
पहिल्या डावात काय झालं?
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने कांगारुंना 47.5 ओव्हरमध्ये 214 रन्सवर गुंडाळलं.
ऑस्ट्रेलियासाठी अनिका लिरॉयड आणि राहेल ट्रेनामन या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. अनिकाने 90 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. तर राहेल ट्रेनामन हीने 51 धावांचं योगदान दिलं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इतरांना झटपट गुंडाळल्याने ऑस्ट्रेलियाला 220 पारही पोहचता आलं नाही. इंडिया एसाठी कॅप्टन राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तितास साधू आणि मिन्नू मणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर शबमन एमडी शकील आणि तनुश्री सरकार या दोघीनी 1-1 विकेट मिळवली.