कोयना व राधानगरी धरणातून सुरू झालेल्या प्रचंड विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नैसर्गिक घडामोडीचा थेट परिणाम नृसिंहवाडी येथील श्री क्षेत्र दत्तमंदिरावर झाला असून, मंदिर परिसर पाण्याने वेढला गेला आहे.
मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजता चालू वर्षातील चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा भक्तिभावात पार पडला. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तब्बल सहा फूटांनी वाढल्याने नदीचे पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून आत प्रवेश करून गाभाऱ्यातील श्रींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडले. या अद्भुत नैसर्गिक सोहळ्याला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे संबोधले जाते.
पोस्ट ऑफीसच्या या योजनेत केवळ व्याजातून 2 लाख कमवा, टॅक्समधूनही सुट
इचलकरंजी : पंचगंगेची पातळी ५५ फुटांवर; जुना पूल बंद
श्रावण मास आणि दक्षिणद्वार सोहळा यामुळे भाविकांसाठी हा दिवस मोठ्या पर्वणीचा ठरला. हजारो भक्तांनी या प्रसंगी पवित्र तीर्थस्नान करून आध्यात्मिक लाभ घेतला. भक्तांच्या श्रद्धेनुसार, या दिवशी या पवित्र स्नानाने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते, असा विश्वास आहे.
श्री दत्त मंदिर हे पूर्वाभिमुख असून समोरून वाहणारी कृष्णा नदी उत्तर ते दक्षिण दिशेने वहाते. पावसाळ्यात नदीच्या प्रवाहामुळे असे अद्वितीय दृश्य निर्माण होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा या राज्यांतून दरवर्षी लाखो भाविक येथे हजेरी लावतात.
महापुराच्या परिस्थितीमुळे दत्त देवस्थान समितीने मंदिर परिसरात विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांनी गर्दी करताना काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.