गणेशोत्सवाला अवघा आठवडा उरला असताना मुसळधार पावसाने गणपती मूर्ती कार्यशाळांमध्ये हाहाकार माजवला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईसह उपनगरांतील आणि आसपासच्या शहरांतील अनेक कार्यशाळांमध्ये पाणी शिरले.
परिणामी तयार व अर्धवट मूर्तींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मूर्तिकारांवर मूर्ती सुरक्षित ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
राज्यात ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांसह मुंबईत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदीसह शहरातील अनेक नाल्यांची पातळी वाढली असून अनेक भागांत पाणी साचले.या परिस्थितीत कार्यशाळांत साचलेल्या पाण्यामुळे शाडूच्या मूर्ती भिजल्या आहेत. भिजलेल्या मूर्ती पुन्हा सुकणे कठीण असल्याने नुकसान भरून निघण्याची शक्यता कमी आहे, अशी खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली.
…लाखोंचे नुकसान
पेणसह ठाणे, मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर मूर्ती बनविल्या जातात. पण कार्यशाळांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे मूर्तीकारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सुनील पाटील या मूर्तिकाराने सांगितले. “ओल लागलेल्या शाडू मूर्ती सुकण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे विक्रीपूर्वीच मूर्ती खराब होण्याची भीती आहे,असे ते म्हणाले.
भिजलेल्या मूर्ती सुकविण्याचे आव्हान
आम्ही बहुतांश बुकिंग झालेल्या मूर्ती घरात सुरक्षित हलवल्या आहेत. मात्र कार्यशाळेत तयार होत असलेल्या मूर्ती पावसाच्या पाण्यात अडकल्या आहेत.त्या भिजल्याने सुकवण्याचे मोठे आव्हान समोर आले आहे,असे चेंबूरमधील मूर्तिकार किशोर सारंग यांनी सांगितले.