राज्य सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एका जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बदलला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. आधी संजय सावकारे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते. पण आता ही जबाबदारी पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंकज भोयर हे वर्ध्याचे सुद्धा पालकमंत्री आहेत. वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना पंकज भोयर यांनी आपली छाप उमटवली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कामाच कौतुक केलं होतं. त्यामुळे पंकज भोयर यांच्याकडे आता वर्ध्यासह भंडाऱ्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांची तडकाफडकी अशी अचानक बदली का केली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या निर्णयामागे भौगोलिक कारण सांगितलं जात आहे. संजय सावकारे यांच्यासाठी भंडारा जिल्ह्यापर्यंत येणं हा लांबचा प्रवास ठरत होता. काही स्थानिक भाजप नेते त्यांच्यावर नाराज होते अशी सुद्धा माहिती आहे. फक्त ते झेंडा पालकमंत्री ठरु नयेत, म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदनापुरता मर्यादीत राहू नये, अशी जिल्ह्यात चर्चा होती. पंकज भोयर यांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यात आता प्रशासकीय कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
इतक्या कमीवेळात संजय सावकारे यांच्याकडून जबाबदारी काढून घेतली, यामुळे विविध चर्चा सुरु आहेत. तरुण चेहऱ्यांना संधी मिळावी, तसच पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रशासनावर पकड असणं सुद्धा तितकच महत्वाच आहे, त्या दृष्टीकोनातून सुद्धा भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत.
नवीन पालकमंत्री काय म्हणाले?
पंकज भोयर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “निश्चित वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीने काम करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ध्यात विविध शासकीय योजनांची अमलबजावणी पार पडली” “तशाच प्रकारे शासनाच्या विविध योजना भंडारा जिल्ह्यात पोहोचवणार. या योजनांची अमलबजावणी करणार” असं पंकज भोयर म्हणाले.
पालकमंत्री अचानक का बदलला?
पालकमंत्री बदलण्याचा निर्णय अचानक का घेतला? त्यावर त्यांनी उत्तर दिलं. “मला सुद्धा या निर्णयाची कल्पना नव्हती. पण भौगोलिक दृष्ट्या विचार करुन हा निर्णय घेतला असावा. संजय सावकारेंसाठी भंडारा लांब पडत होतं. माझ्या स्थानापासून वर्धा आणि भंडारा दोन्ही मला जवळ आहे. संजय सावकारे साहेबांनी सुद्धा उत्कृष्ट काम केलय” असं पंकज भोयर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सुद्धा विदर्भातून येतात.