गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राज्यभरातील गणेशभक्तांची सर्वाधिक उत्सुकता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असते. दरवर्षी लाखो भक्त येथे लांबच लांब रांगा लावून दर्शन घेतात. यंदा या भक्तांसाठी विशेष सोय म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘अन्नछत्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. प्रसादाच्या स्वरूपात भोजन मिळावे यासाठी लालबागमधील पेरू कंपाऊंड परिसरात तीन अन्नछत्र उभारले गेले. मात्र, यावरून आता वादंग निर्माण झाले आहे.
अन्नछत्र उभारल्याने
कारवाईची तयारी
मंडळाने केलेल्या या व्यवस्थेमुळे एकावेळी सुमारे 500 पेक्षा जास्त भक्त प्रसादरूपी जेवण घेऊ शकतील, अशी सोय करण्यात आली होती. मात्र, संभाव्य गर्दी, चेंगराचेंगरीचा धोका तसेच कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेता मुंबई पोलिसांनी या अन्नछत्राला परवानगी नाकारली. त्यानंतर अग्निशमन दलानेही सुरक्षा धोक्याचे कारण देत मंडळाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला नाही. तरीदेखील मंडळाने अन्नछत्र उभारल्याने आता मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण वॉर्डकडून कारवाईची तयारी सुरू करण्यात आली आहे.
कंपाऊंडच्या मूळ मालकाला थेट नोटीस बजावली
महापालिकेने मंगळवारीच पेरू कंपाऊंडच्या मूळ मालकाला थेट नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये उभारण्यात आलेला मंडप आणि संबंधित साहित्य त्वरित हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 24 तासांची मुदत देऊन अन्नछत्र न काढल्यास महापालिकेच्याच वतीने कारवाई करून ते हटवले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी या नोटीशीची मुदत संपल्यावर पुढील हालचाली काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यास आपत्कालीन परिस्थिती…
सध्या संबंधित जागा एका विकासकाच्या ताब्यात असून त्यालाच नोटीस देण्यात आली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस आणि अग्निशमन दलाने परवानगी नाकारल्यानंतरच ही नोटीस बजावण्यात आली आहे. कारण, मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यास आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दीचे नियोजन करण्यासाठी यंदा तब्बल साडेतीन हजार स्वयंसेवक कार्यरत असतील. महिला कार्यकर्त्यांबरोबरच पोलिसांचाही मोठा ताफा तैनात केला जाणार आहे. सुरक्षिततेवर भर देऊन मंडळाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. परंतु, अन्नछत्रामुळे होणाऱ्या अतिरिक्त गर्दीबद्दल प्रशासन साशंक आहे.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले की, एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर भक्त अन्नछत्रात जमू शकतात. त्या परिस्थितीचे नियोजन स्पष्ट नसल्याने परवानगी दिली नाही. पोलिस आणि महापालिकेकडून मंजुरी मिळाल्यासच आम्हीही परवानगी देऊ, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.भक्तांच्या सोयीसाठी केलेली ही योजना स्वागतार्ह असली तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचे परिणाम लक्षात घेऊन सुरक्षिततेस प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या अन्नछत्राबाबत पुढील काही तासांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.