कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयाचा हलगर्जीपणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णालयाने एका दहा वर्षाच्या मुलाला डायबिटीज- रक्त पातळ करण्याची औषधे लिहून दिल्याचा प्रकार घडला आहे. या मुलाच्या नातेवाईकांनी त्यामुळे रुग्णालयात गोंधळ घालत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. कल्याणच्या आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण पश्चिम परिसरात राहणारा दहा वर्षाचा सिद्धार्थ गायकवाड याला टायफाईड आणि निमोनियाची लागण झाल्याने त्याला कल्याण आधारवाडी चौक परिसरातील मनोमेय या रुग्णालयात 23 तारखेला उपचारासाठी दाखल केले होते . 25 तारखेला सिद्धार्थला या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र यावेळेस संबंधित डॉक्टरांनी त्याला काही औषध लिहून दिली होती. या औषधांमध्ये एका दुसऱ्या रुग्णांची देखील औषधे लिहीण्यात आली होती.सिद्धार्थ कुटुंबियांनी ही औषध विकत घेतली आणि ते घरी गेले.
दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितले
आज सकाळी मुलाला इंजेक्शन देण्यासाठी ते एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेले असता त्या डॉक्टरांनी हे प्रीस्क्रीप्शन वाचले आणि त्यांना धक्काच बसला. टायफाईड आणि निमोनियाच्या औषधांसह डायबिटीस आणि रक्त पातळ करण्याचे देखील औषध त्या प्रिस्क्रीप्शनमध्ये देण्यात आली होती.त्याने याबाबत तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली.कुटुंबियांनी याबाबत मनोमेय रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला.मुलाच्या उपचारात निष्काळजीपणा करत चुकीचे औषध देणाऱ्या संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत मनोमेय रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर सनी सिंग यांनी संबंधित डॉक्टरकडून चुकून दुसऱ्या रुग्णाचे देखील औषध या दहा वर्षाच्या मुलाच्या प्रीस्क्रीप्शनमध्ये लिहिण्यात आल्याचे सांगितले. झालेली चूक कबूल करत याबाबत संबंधित कुटुंबीयांना ही औषधं न घेण्याबाबत कळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, या घटनेमुळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अशा गोंडस नावाखाली रुग्णालये थाटली जातात रुग्णांच्या आरोग्याशी हलगर्जीपणा केला जातो असे उघड झाले आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.