कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कनवाड येथे प्रेमप्रकरणाच्या कारणावरून गंभीर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एका मुलीने प्रियकरासोबत पळून जाण्यास मदत केल्याचा संशय व्यक्त करत तिच्या नातेवाईकांनी युवकाच्या कुटुंबावर दगडफेक व मारहाण केली.
या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेनंतर शिरोळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दहा जणांना अटक केली असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.