केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक महिलेच्या विरोधात पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेवर एका अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन त्याच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
17 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत संबंध
पोलिसांनी मंगळवारी (2 सप्टेंबर) या घटनेची माहिती दिली. आरोपी महिला 30 वर्षांची असून ती तिच्या नात्यातील एका 17 वर्षांच्या मुलासोबत पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी महिला आणि पीडित तरुणाच्या कुटुंबियांकडून दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोघांचाही शोध घेतला असता ते कर्नाटकातील कोल्लूरमध्ये असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात..
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी महिला आणि अल्पवयीन तरुण पळून गेल्यानंतर तिथे दोघांनीही मोबाईलचा फोनचा वापर केला नाही. दोघांनाही कर्नाटकातील कोल्लूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. संबंधित महिलेने तिथे राहण्यासाठी एक घर भाड्याने घेतलं होतं. एका कौटुंबित समारंभात आरोपी महिलेची त्या अल्पवयीन तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतरच महिलेने तरुणाचं शोषण करण्यास सुरूवात केली असल्याचं सांगितलं जात आहे.
महिलेला पोक्सो कायद्याअंतर्गत कलमांखाली अटक
पोलिसांनी माहिती दिली की महिलेच्या पतीने तिला सासरच्या घरी परत नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी महिला अल्पवयीन तरुणासोबत त्याच्या गावातून पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. चेरथला पोलिसांनी आरोपी महिलेला पोक्सो कायद्याअंतर्गत कलमांखाली अटक केली असून कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवल्याची माहिती आहे. तसेच, संबंधित तरुणाला त्याच्या कुटुंबियांकडे परत सोपवण्यात आलं आहे.




