कुख्यात गुंड अरुण गवळी जामिनीवर नागपूरच्या मध्यवर्ती तरुंगातून बाहेर आला. नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणले.
तेथून गवळी विमानाने मुंबईकडे रवाना झाला.
अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाकडून १८ वर्षांनंतर जामीन मंजूर झाला असून, (मंगळवारी) त्याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले. आणि त्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
विशेष म्हणजे, गवळीला कारागृहामागील गेटमधून गुपचूप बाहेर सोडण्यात आले. त्याची सुटका गुप्त ठेवण्यासाठी कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. गवळीवर २००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निकालाविरोधात त्यांने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते, मात्र २०१९ मध्ये उच्च न्यायालयानेही त्यांना दिलेली शिक्षा कायम ठेवली.
दीर्घकाळ चाललेल्या कारावासानंतर वय आणि आरोग्याच्या कारणास्तव गवळीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने त्याची याचिका मंजूर करत जामीन मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की हा जामीन सत्र न्यायालयाने ठरवलेल्या अटींवर आधारित असेल. तसेच, या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.
अरुण गवळी मुंबई अंडरवर्ल्डमधील एक मोठं आणि कुख्यात नाव मानलं जातं. ‘डॅडी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या गवळीने गुन्हेगारी जगातून राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभेतही पोहोचला. त्यांने स्वतःचा पक्ष ‘अखिल भारतीय सेना’ स्थापन करून स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, गुन्हेगारी प्रकरणांमुळे त्याचा बराच काळ तुरुंगात गेला. गवळीच्या सुटकेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कारण, त्याचा भूतकाळ लक्षात घेता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर गवळीचे राजकीय आणि सामाजिक भविष्य अवलंबून आहे.