राज्यात मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. मुंबईत शनिवारी काही ठिकाणी पाऊस झाला. तर पुण्यातही पावसाने हजेरी लावली. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
दरम्यान, रविवारी आणि सोमवारी मुंबईत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर रायगड आणि रत्नागिरीला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. तर बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. मात्र तरीही मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय.
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलीय. तर पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. रविवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यानं कमी दाबाचा पट्टा सक्रीय झालाय. यामुळे राज्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. पावसाला पोषक असं वातावरण तयार होत असून रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.