ऐतिहासिक वाघनखे दि. 2 ऑक्टोबर रोजी नागपूरहून कोल्हापुरात दाखल होणार आहेत. यानंतर दि. 3 ते दि. 3 मे 2026 असे आठ महिने ही वाघनखे कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ अर्थात लक्ष्मी-विलास पॅलेस येथे आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या प्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी सांगितले.
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. सातारा येथे दि. 20 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत त्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. यानंतर ती नागपूर येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. दि. 1 फेब-ुवारी ते दि. 30 सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन असून, दि. 2 ऑक्टोबर रोजी ही वाघनखे कोल्हापुरात येतील. कोल्हापुरात दि. 3 मेपर्यंत, आठ महिने हे प्रदर्शन राहणार असून, त्यानंतर या वाघनखांचे मुंबई येथे आठ महिने प्रदर्शन भरवले जाणार आहे.
या ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि. 22 सप्टेंबर रोजी राज्याचे पर्यटन संचालक कोल्हापुरात येणार आहेत. यानंतर या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख आणि कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट होईल, या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.