टॅरिफमळे सध्या जगाच्या केंद्रस्थानी राहून चर्चेत असलेल्या अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे अमेरिकन पोलिसांनी भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची गोळ्या झाडून हत्या केली. यामध्ये मूळचा तेलंगणातील असलेल्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरूणाचं त्याच्या रूममेटशी भांडण झालं होतं, बघता बघात ते भांडण इतक वाढलं की चाकू उगारण्यपर्यंत मजल गेली, अशी माहिती समोर आली आहे. या हिंसक भांडणामुळे त्या तरूणाच्या शेजाऱ्याने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कोणतीही चौकशी अथवा तपास न करताच त्या तरूणावर धाडधाड 4 गोळ्या झाडल्या, असा आरोप आहे. यामुळे त्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याकडे विनंती केली आहे. 3 सप्टेंबरला ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा, तेलंगणाच्या महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद निजामुद्दीन याचा कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे गोळ्या घालून मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांनी भारत सरकार आणि राज्य सरकारला त्यांच्या मुलाचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत आणण्याचे आवाहन केले आहे. निजामुद्दीन हा 2016 साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. त्याने फ्लोरिडाच्या एका महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर तिथल्या एका कंपनीत नोकरी सुरू केली. नंतर त्याला बढती मिळाली आणि तो कॅलिफोर्नियाला गेला.
त्याचे वडील मोहम्मद हसनुद्दीन म्हणाले की, माझा मुलगा शिकण्यासाठी म्हणून 2016 साली अमेरिकेत गेला होता, तिथे मेहनत करून शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने नोकरी करण्यस सुरूवात केली. त्यानंतर त्याला प्रमशन मिळालं आणि तो कॅलिफोर्नियाला शिफ्ट झाला, पण तिथेच त्याला गोळ्या मारण्यात आला. माझ्या मुलाचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत आणावा अशी मी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना विनंती करतो, असेही त्यांनी नमूद केलं.
10-15 दिवसांपासून काही संपर्कच नाही
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की गेल्या 10-15 दिवसांपासून ते निजामुद्दीनशी संपर्क साधू शकले नाहीत. शुक्रवारी त्यांना सोशल मीडिया आणि ओळखीच्या लोकांकडून माहिती मिळाली की कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या भांडणानंतर पोलिसांच्या गोळीबारात निजामुद्दीनचा मृत्यू झाला आहे. एका नातेवाईकाने सांगितले की, निजामुद्दीनचा त्याच्या रूममेटशी एअर कंडिशनरवरून वाद झाला होता, ज्याचे हाणामारीत रूपांतर झाले. भांडणात चाकूंचा वापरही करण्यात आला होता. त्यानंतर शेजाऱ्याने पोलिसांना बोलावले.
पोलिस जेव्हा त्यांच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांनी दोघांनाही हात वर करायला सांगितलं. एका तरूणाने पोलिसांचं ऐकत हात र केले, पण निजामुद्दीनने तसं काहीच केलं नाही. म्हणनच अमेरिकनपोलिसांनी त्याच्यावर गोळया झाडल्या आणि त्यातच निजामुद्दीनचा मृत्यू झाला. योग्य तपास न करता गोळीबार होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी चार गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे.
केंद्र सरकारला भावनिक आवाहन
ही घटना 3 सप्टेंबर 2025 रोजी घडली अशी माहिती निजामुद्दीनचे वडील हसनुद्दीन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. कॅलिफोर्नियातील सांता क्लारा पोलिसांनी हा गोळीबार केला. निजामुद्दीनचा मृतदेह स्थानिक रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्याचा मृदेह मेहबूबनगरला मृतदेह आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कुटुंबियांनी तेलंगणा सरकारला, केंद्र सरकारला केले आहे. ” माझ्या मुलाचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत आणावा अशी मी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो ” असे त्याचे वडील म्हणाले.