राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.मान्सूनच्या परतीची प्रणााली सक्रीय झाली असूनही राज्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे.आज गुरूवारी (१८ सप्टेंबर) रोजी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.(Maharashtra Weather Update)
कोणत्या भागांमध्ये अलर्ट?
जोरदार पावसाचा यलो अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर
वादळी पावसाचा इशारा (विजांसह) : नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
हवामानाची स्थिती कशी असेल?
मराठवाडा आणि परिसरात सुमारे ३.१ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
दक्षिण कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर मध्य प्रदेशापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाची रेषा असल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे.
बुधवारी वर्धा येथे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले; काही भागात उष्णतेची तीव्रता कायम आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास
१४ सप्टेंबरपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थानातून परतीला सुरुवात केली. १६ सप्टेंबरला गुजरात, पंजाब, हरियाणा या राज्यांतूनही मॉन्सून माघारी गेला; मात्र महाराष्ट्रात अद्याप पावसाची तीव्रता कमी झालेली नाही.
राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, नदी-नाल्यांजवळ अनावश्यक वावर टाळावा. पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत करा, जेणेकरून हानी टाळता येईल.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* पिकांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची साफसफाई करा, पाणी साचू देऊ नका.
* वादळी पावसामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो; पिकांचे नियमित निरीक्षण करा.
* सोयाबीन, भात, तूर, उडीद यांसारख्या पिकांमध्ये पानांवर डाग किंवा कुज दिसल्यास त्वरित योग्य फवारणी करा.