सध्या मान्सून परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून जळगावसह राज्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
दरम्यान राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसत नसून अशातच आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला असून त्याच पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या राज्यात ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. काही भागांत मुसळधार पावसाचा तडाखा तर काही ठिकाणी कमाल तापमानाची चढ-उतार सुरू आहे. मागील काही दिवसापूर्वी जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे घरांचे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान राज्यात पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे.
उत्तर अंदमान समुद्रात म्यानमार किनाऱ्यालगत 22 सप्टेंबरपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याच प्रभावामुळे 25 सप्टेंबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण उत्तर प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात पावसाची परिस्थिती बदलत राहील.
आज या जिल्ह्यांना अलर्ट?
आज विजांसह पावसाचा इशारा नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.