तूझ्या मुलांना चांगले शिक्षण देतो, असे आमिष देऊन एका शेतात काम करणाऱ्या सालगड्याचे तिन मुलांचे अपहरण करण्यात आले. ही गंभीर घटना दि.१९ सप्टेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर मुलांच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रितसर तक्रार दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारेगाव पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथे रवाना करण्यात आले आहे.
लक्ष्मण गोमा टेकाम रा. बोटोनी असे तक्रार करणाऱ्या मुलांचे सावत्र वडीलांचे नाव आहे. दि. २३ सप्टेंबर रोजी मारेगाव पोलिसात त्यांनी तक्रार दाखल केली. आरोपी देविदास अंबादास वावरे (वय ४४) रा. पांढरकवडा ह.मु. निशानघाट ता. जि. अदिलाबाद (तेलंगाना) याचे सोबत अपहरण झालेल्या मुलांच्या आई वडीलासोबत ओळख होती. फिर्यादीचे आई वडील काम करण्यासाठी एक वर्षा पूर्वी निशानघाट येथे गेले होते. तिथे त्यांची ओळख झाली होती.
सध्या फिर्यादी मारेगाव तालुक्यातील वडगाव येथे सालगडी म्हणून शेतात वास्तवाला आहे. ओळखीचा फायदा घेऊन आरोपी वडगाव येथे आला आणि मुलांच्या आई-वडिलांना मी तुमच्या मुलांचे चांगले पालनपोषण करतो व शिक्षण ही देतो असे म्हणून दि. १९ सप्टेंबरचे संध्याकाळी अनिता (९), शंकर (६) व नानू (३) या तीनही मुलांना घेऊन गेला. दि. २० सप्टेंबरला मुले कशी राहतात, म्हणून फिर्यादीने दिलेल्या फोनवर फोन केला.
तेव्हा आरोपीचा फोन स्विच ऑफ आला. वारंवार फोन लावून ही फोन लागत नसल्याने वडिलांनी निशानघाट तेलंगाना येथे आरोपीच्या घरी जाऊन मुलांचा शोध घेतला. मात्र, तिथे मुले आणि आरोपी आढळून आला नाही. त्यामुळे फिर्यादीच्या पाया खालची वाळू घसरली. तेलंगानातून परत येत मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपी देविदास वावरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांकडून मुलांचा शोध सुरु आहे.




