Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीकोल्हापूर, इचलकरंजीतील पाच संघटित टोळ्यांतील 42 गुंड 'मोका'च्या रडारवर

कोल्हापूर, इचलकरंजीतील पाच संघटित टोळ्यांतील 42 गुंड ‘मोका’च्या रडारवर

गुन्हेगारी टोळ्यांसह काळे धंदेवाले आणि कुख्यात तस्कराची दहशत मोडून काढण्यासाठी कोल्हापूर पोलिस दल अ‍ॅक्शन मोडवर आहे. शाहूपुरीतील कुख्यात गब्बर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यानंतर कोल्हापूर आाणि इचलकरंजीतील 5 गुन्हेगारी टोळ्यांतील 42 नामचिन गुंड ‘रडार’वर आले आहेत.

 

मोका’अंतर्गत कारवाईचे पाचही प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे दाखल झाले आहेत. या प्रस्तावावर काही दिवसांत कारवाई शक्य असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

 

फाळकूट गुंडांची दहशत आणि काळ्याधंद्याचे विस्तारलेले साम-ाज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुंडांविरोधात कारवाईचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय आश्रयाने बस्तान बसविलेल्या म्होरक्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस कारवाईपासून अभय मिळण्यासाठी टोळ्यांच्या म्होरक्यासह सराईतानी मुंबईतून फिल्डिंगसाठी धडपड सुरू केली आहे. मात्र अद्याप तरी टोळ्यांना प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून येत नाही.

 

नामचिन गुंड, तस्करी टोळ्या पोलिसांच्या टार्गेटवर!

 

महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नामचिन टोळ्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या टार्गेटवर आहेत. ‘मोका’अंतर्गत कारवाईसह तडीपारी, झोपडपट्टीदादा विरोध कायद्याचा प्रभावी अंमल करण्याच्या सक्त सूचना पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

 

कोल्हापुरातील 3, इचलकरंजी परिसरातील 2 टोळ्यांचे प्रस्ताव

 

कोल्हापुरातील शाहूपुरी भागात दहशत माजविणार्‍या कुख्यात टोळीचा म्होरक्या आदित्य ऊर्फ गब्बरसह त्याच्या सात साथीदारांविरुद्ध ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. पाठोपाठ फुलेवाडी रिंगरोड परिसरात दहशत माजविणार्‍या गवळी टोळीचा म्होरक्या आदित्य, सिद्धांत गवळीसह त्याचे साथीदार रडारवर आहेत. या टोळीतील किमान 13 ते 15 साथीदारांवर ‘मोका’ कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय कोल्हापुरातील आणखी दोन आणि इचलकरंजीसह परिसरातील दोन अशा 5 टोळ्यांचा समावेश आहे, असेही विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात आले.

 

पाचपेक्षा जादा गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेले समाजकंटक रडारवर!

 

अमली पदार्थ, गुटखा, गोवा मेड देशी, विदेशी दारू, गावठी हातभट्टी तस्करांसह पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्या काळ्या धंद्यांशी संबंधित समाजकंटकांचा ‘मोका’अंतर्गत कारवाईच्या प्रस्तावात समावेश असल्याचेही सांगण्यात आले. पाचही प्रस्तावावर टप्प्याटप्प्याने कारवाई शक्य आहे. मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असली तरी सराईत गुंड आणि तस्करांच्या हालचालीवर पोलिस नजर ठेवून आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -