तानंगमध्ये किरकोळ कारणातून एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तलवारीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत शंकर दत्तात्रय पाटील (बय ५५,रा.काळे मळा, तानंग) हे जखमी झाले आहेत.
याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी दोन महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित अतुल अरुण पाटील, वसंत आत्माराम पाटील, इंदूबाई बसंत पाटील, संगिता अरुण पाटील (सर्व रा. काळे मळा, तानंग ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जखमी शंकर पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
जखमीने संशयितांना नंदलगी यांच्या शेतातील वैरण कापू नका, असे सांगितल्यावर एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर दुसऱ्याने तलवारीने हल्ला केला. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर पाटील यांनी तानंग येथील नंदलगी यांच्या शेतातील वैरण कापू नका, असे सांगितल्यानंतर संशयित बसंत पाटील यांनी शंकर पाटील यांना मारहाण केली.
यावेळी संशयित अतुल पाटील तलवार घेऊन आला. तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून शंकर पाटील यांच्या डोक्यात, दोन्ही मांडीवर तलवारीने बार करून जखमी केले.
यावेळी अतुलची आजी इंदूबाई, आई संगीता व बसंत पाटील, अतुल पाटील यांनी शंकर पाटील यांना मारहाण केली. तर अतुलची आई संगीताने शंकर पाटील यांची पत्नी मनिषा हिला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.






