इचलकरंजी परिसरात विविध गंभीर गुन्हे करून दहशत माजविणार्या एस. एन. गँगवर ‘मोका’ची कारवाई करण्यात आली. म्होरक्या सलमान राजू नदाफ (25, रा. परीट गल्ली गावभाग), अविनाश विजय पडीयार (19, रा.पडियार वसाहत, यड्राव), अरसलान यासीन सय्यद (19, सध्या रा. सुतारमळा, मूळ रा. जवाहरनगर सरनाईक वसाहत), यश संदीप भिसे (19, रा. रामनगर शहापूर), रोहित शंकर आसाल (19, रा. शिंदेमळा, खोतवाडी), अनिकेत विजय पोवार (22, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) या 6 जणांचा कारवाईत समावेश आहे. या कारवाईला विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.
शहरातील गावभाग परिसरात 15 जुलै रोजी सलमान नदाफ हा साथीदारांसमवेत फटाके उडवत होता. त्यावेळी पूनम प्रशांत कुलकर्णी यांनी फटाके लांब जाऊन लावा असे सांगितले. या कारणावरून चिडून नदाफ याच्यासह त्याच्या साथीदाराने कुलकर्णी यांच्यावर खुनी हल्ला केला. त्यांच्या ब्युटी पार्लरच्या दरवाजा, बोर्डाचे व खिडकीचे, शेजारी राहणारे दयानंद लाड यांच्या दुकानाच्या शटरचे व सागर पाटील यांच्या शौचालयाच्या दरवाजाचे नुकसान केले. याप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गावभाग पोलिसांनी या टोळीवर गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपास स.पो.नि. पूनम जाधव-माने यांनी केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी या पार्श्वभूमीवर अपर अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांना मोका कारवाईचा प्रस्ताव सादर करणेचे निर्देश दिले. गावभागचे पो. नि. महेश चव्हाण यांनी मोका प्रस्ताव सादर केला. प्रस्तावाची स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छाननी करून पोलिस अधीक्षक यांचेकडे सादर केला. त्यांनी दाखल केलेल्या एस. एन. गँगच्या सहाजणांवरील मोका प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी शनिवारी मंजुरी दिली. कारवाईत पो. हवालदार उदय करडे, साजीद कुरणे, सहा. फौजदार सचिन पाटील आदींनी सहभाग घेतला.
टोळीवर 18 गुन्हे
एस. एन. गँगवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, प्राणघातक शस्त्रासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी मारामारी असे 17 गंभीर व दखलपात्र आणि एक अदखलपात्र असे एकूण 18 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सलमान नदाफ या म्होरक्यावर तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत.






