नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. पाटोदा खुर्द येथे प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
25 ऑक्टोबरच्या सकाळी गावात ही घटना उघडकीस आली. मंगल धुमाळे (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेचे गावातील कृष्णा जाधव (वय 30) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, कृष्णाला दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत होता.
घटनेच्या एक दिवस आधी रात्री दोघांमध्ये दारूवरून वाद झाला होता. पोलिसांचा अंदाज आहे की, या वादातूनच प्रियकराने संतापाच्या भरात मंगल यांचा गळा दाबून खून केला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी मंगल यांच्या आई पाणी आणायला मंगल यांच्या घरी गेल्यावर घरात मृतदेह पाहिला आणि लगेच गावकऱ्यांना व पोलिसांना कळवले.
पोलिस तपासात काही ठोस पुरावे हाती आले असून महिलेच्या घराबाहेर कृष्णाच्या चपला आढळल्या, तर मंगल यांच्या बहिणीने 24 ऑक्टोबरच्या रात्री कृष्णाला मंगल यांच्या घरातून बाहेर जाताना पाहिल्याचे सांगितले आहे. मंगल या वेगळी खोली करून एकट्या रहात होत्या. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांचा संशय अधिक बळकट झाला आहे. घटनेनंतर संशयित कृष्णा जाधव गावातून फरार झाला असून, किनवट पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
