शहरातून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे पुढील चाक फुटून प्रवाशांसह बस टोलनाक्याच्या दुभाजक भिंतीवर आदळली. ही घटना मंगळवारी (ता.२७) साडेबाराच्या सुमारास घडली
अपघातात बसमध्ये डाव्या बाजूच्या खिडकीत बसलेली महिला थेट रस्त्यावर फेकली जाऊन त्याच बसच्या मागील चाकात सापडून चिरडली गेली. साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा, ता. यावल) असे मृत महिलेचे नाव आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील बस (एमएच १४, बीटी २३०६) ही जळगावकडून भुसावळकडे जाण्यासाठी निघाली होती. राष्ट्रीय महामार्गावर बसने वेग धरला आणि नशिराबाद टोलनाक्याच्या काही अंतर अगोदरच बसचे पुढील टायर अचानक फुटले. अचानक टायर फुटल्याने आत बसलेल्या प्रवाशांना जोरदार धक्का लागून ते आपल्या जागेवरून इकडून तिकडे फेकले गेले.
अशातच डाव्या बाजूला खिडकीत बसलेली महिला चक्क खिडकीतून बाहेर महामार्गावर फेकली जाऊन त्याच बसच्या मागील चाकात सापडून मृत्युमुखी पडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस महामार्गावर एका बाजूला ओढत जाऊन उलटते की काय? या भीतीने चालकाने स्टिअरिंगवर नियंत्रण मिळविण्याचे केलेले प्रयत्न बसच्या गतीमुळे अयशस्वी होऊन धावती बस नशिराबाद टोलनाक्याजवळील दुभाजकाच्या भिंतीवर आदळली. बसमधील प्रवाशांना इकडून तिकडे फेकले गेल्यामुळे मुका मार आणि किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
घर गाठण्यापूर्वीच मृत्यूची झडप
पाडळसा (ता. यावल) येथील रहिवासी साराबाई गणेश भोई (वय ४६) या आज त्यांचे डोळे तपासण्यासाठी जळगावात आल्या होत्या. दवाखान्याचे काम आटोपून त्या पुन्हा घरी जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. खिडकीजवळील नेमकी जागा त्यांना मिळाली होती. अपघातग्रस्त बसचे टायर फुटून अनियंत्रित बसचा धक्का लावून साराबाई चक्क खिडकीतून थेट महामार्गावर फेकल्या गेल्या.
खाली पडताच बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. भुसावळ बसस्थानकावर उतरून यावलसाठी बस नाही मिळाली तर रिक्षाने घरी निघून जाऊ असे त्यांचे नियोजन होते. मात्र, तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
महामार्गावर वाहतूक थांबली
अपघातानंतर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी मदतीसाठी धाव धेतली. नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती देण्यात येऊन काही वेळातच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तर मृत साराबाई भोई यांचा मृतदेह जिल्हा व सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आला. अपघाताची माहिती भोई कुटुंबीयांसह ग्रामस्थ नातेवाइकांना मिळाल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. साराबाईंचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार असून, पती गणेश भोई हे पारंपरिक व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
मोठी प्राणहानी टळली
दरम्यान, टायर फुटून अनियंत्रित बस पुलावरून कोसळली असती, टोलनाक्यावर उभ्या इतर वाहनांवर आदळली असती, किंवा एखाद्या मालवाहू ट्रकवर आदळली असती तर अशा परिस्थितीत बसमधील प्रवाशांसह मृत्युुमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक झाली असती, अशी शक्यता प्रत्यक्षदर्शींनी यावेळी व्यक्त केली.
घडलेली घटना दुर्दैवी असून, एसटीचे टायर फुटून हा अपघात झालेला नसल्याचे एसटीच्या वाहन विभागाच्या अभियंत्यांच्या तपासणीतून दिसून आले आहे. एसटी वेगात असताना गाडीसमोर दुचाकीचालक आल्याने वाहकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावर चढल्याने हा अपघात घडला आहे. दर महिन्याला चालकांना वाहन चालविण्याचे प्रबोधनात्मक माहिती दिली जात असते.
