Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: वाढदिनीच ओढावला मृत्यू! उसााच्या ट्रॉलीखाली चिरडून ६१ वर्षीय वृद्धाने गमावला जीव...

इचलकरंजी: वाढदिनीच ओढावला मृत्यू! उसााच्या ट्रॉलीखाली चिरडून ६१ वर्षीय वृद्धाने गमावला जीव रांगोळीतील घटना

जिल्ह्यात रेंदाळ व शिरोळमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दोघेजण ठार झाले. रेंदाळमधील घटनेत वृद्धाचा तर शिरोळ येथील घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दादासाहेब बाळासाहेब पाटील (वय ६१, रा. रांगोळी) असे मृताचे नाव आहे. हुपरी – इचलकरंजी मार्गावरील रेंदाळ येथे रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब पाटील आपल्या दुचाकी (क्र. एम. एच. ०९ एम. ४५००) वरून हुपरी येथे एका नातेवाइकाकडे कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते गावी परत निघाले होते. दरम्यान, इचलकरंजीहून ऊस भरून ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. एम. एच. ०८ सी. जे. ९०३७) हुपरीकडे येत होती.

 

रेंदाळ येथील भीमनगरजवळ एका वळणावर ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात दादासाहेब पाटील रस्त्यावर पडले. ट्रॉलीचे डाव्या बाजूचे मागील चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन्ही ट्रॉली क्रमांकाविना आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे करत आहेत

 

वाढदिवसादिवशीच काळाचा घाला…!

 

दादासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस होता. सकाळीच गावातील सरपंच तसेच पदाधिकारी व नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारून ते हुपरीला आले होते. मोबाईलवर स्टेटस्‌ तसेच सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे संदेश ठेवले असतानाच सायंकाळी त्यांच्या श्रद्धांजलीचे संदेश ठेवण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवारावर आला.

 

दादासाहेब पाटील हे रांगोळीतील विकास सेवा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

 

स्पर्धा परीक्षा केंद्राचे स्वप्न अपुरे…

 

अनेक सामाजिक उपक्रमात दादासाहेब पाटील यांचा सक्रिय सहभाग असायचा. वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका केंद्र व वाचनालय सुरू करण्याचा त्यांनी आज संकल्प केला होता. त्यासाठी सोसायटीमधील खोल्या उपलब्ध करून देण्याचे तसेच अभ्यासिकेसाठी २१ हजार तर पुस्तकांसाठी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली होती; पण अपघाताच्या दुर्दैवी घटनेने त्यांचा हा संकल्प अधुरा राहिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -