इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारी सलग सातव्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर १६.४ टक्क्यांनी घसरल्यामुळे बाजार भांडवलात ३७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्यामुळे हा फटका बसला आहे.
इंडिगोकडे भारतातील देशांतर्गत विमानसेवेचे जवळपास ६६ टक्के नियंत्रण आहे. नवीन उड्डाण नियम आणि वैमानिकांच्या कामाची वेळ यामुळे मोठ्या संख्येने विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गेल्या सहा दिवसांत, इंडिगो एअरलाइनने २,००० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. ज्यामुळे देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले होते.
शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले की, या अडथळ्यांमुळे कंपनीच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा अजून कमकुवत झाली आहे. ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टेकने इंटरग्लोब एव्हिएशनवर त्यांचे ‘सेल’ रेटिंग कायम ठेवले असून टार्गेट प्राइज ४,०४० रुपये ठेवली आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील कमकुवत कामगिरीनंतर तिसऱ्या तिमाहीत कंपनी पुन्हा सावरण्याची शक्यता कमी आहे.
या संकटावर मात करण्यासाठी इंडिगोने उच्चस्तरीय पथक स्थापन केले आहे. यामध्ये कंपनीचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता, संचालक मंडळाचे सदस्य ग्रेग सारेत्स्की, माइक व्हिटकर आणि अमिताभ कांत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांचा समावेश आहे.
प्रतिस्पर्धी कंपनी स्पाइसजेट सुसाट
इंडिगोला सरकार आणि प्रवाशांसह इतरही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशात त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी स्पाइसजेट मात्र शेअर बाजारात दमदार कामगिरी करत आहे. स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये आज (८ डिसेंबर) तब्बल १४ टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. केवळ दोन दिवसांतच स्पाइसजेटचे शेअर्स १७ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांत सुमारे १७ टक्के आणि पाच दिवसांत सुमारे २ टक्के वाढ झाली आहे, परंतु गेल्या एका महिन्यात सुमारे ३ टक्क्यांनी घसरण झाली होती. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर २३ टक्क्यांहून अधिक आणि २०२५ मध्ये आतापर्यंत ४१ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी इंडिगोच्या समस्येवर बोलताना सांगितले की, इंडिगोच्या क्रू रोस्टरिंग आणि अंतर्गत नियोजनातील समस्यांमुळे हे संकट निर्माण झाले आहे.
“देशांतर्गत विमान सेवेत अधिकाधिक कंपन्यांनी उतरण्याची गरज आहे. आज भारतात पाच मोठ्या विमान कंपन्या चालू शकतील इतकी क्षमता आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून अधिक विमान कंपन्यांना देशांतर्गत सेवेत उतरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असे त्यांनी म्हटले.






