राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS या संघटनेचा विस्तार देशभरात झालेले आहे. आज या संस्थेचे लक्षावधी स्वयंसेवक आहेत. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी संघाची शिबिरं आयोजित केली जातात. संघाचं मुख्यालय नागपुरात आहे. परंतु त्याचे अस्तित्त्व संपूर्ण देशभरात पाहायला मिळते. संघाची रचना, काम करण्याची पद्धत यामुळेच संघाचा एवढा विस्तार होऊ शकलेला आहे. असे असतानाच आता या संघटनेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झालेली असताना मोठी अपडेट समोर आली आहे. या संघटनेच्या रचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.
संघात प्रांत प्रचारक हे पद नसेल
मिळालेल्या माहितीनुसार संघाला 100 वर्षे पूर्ण झालेली असताना त्याच्या कार्यप्रणालीत मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार प्रांत प्रचारकांच्या रचनेत तसेच कामाच्या व्याप्तीत बदल केला जाणार आहे. या बदलासाठी संघात एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार आता संघात प्रांत प्रचारक हे पद नसेल. त्याऐवजी विभागीय प्रचारक (संभाग प्रचारक) असतील. विभागीय प्रचारकांचे कार्यक्षेत्र हे प्रांत प्रचारकांपेक्षा कमी असेल.
नव्या रचनेनुसार काय काय बदल होणार?
मिळालेल्या माहितीनुसार संघाच्या नव्या रचनेत आता प्रत्येक राज्यात एक राज्य प्रचारक असेल. तसेच दोन शासकीय विभाग (कमिशनरी) मिळन संघाचा एक विभाग तयार होईल. उदाहरणादखल उत्तर प्रदेशात संघ ब्रज, अवध, मेरठ, कानपूर, काशी आणि गोरक्ष अशा सहा प्रांतामध्ये विभागलेला आहे. पण प्रशासनाच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास उत्तर प्रदेशात एकूण 18 मंडळ आहेत. हीच बाब लात घेऊन आता उत्तर प्रदेशात एकूण 9 विभागीय प्रचारक असतील तसेच उत्तर प्रदेशात एक राज्य प्रचारक असेल. सध्या उत्तर प्रदेशात फक्त 6 प्रांत प्रचारक आहेत.
देशात 75 विभागीय प्रचारक
नव्या बदलानुसार संघात एकूण 11 क्षेत्र प्रचारक आहे. नव्या बदलानंतर ही संख्या 9 पर्यंत खाली येणार. या बदलानुसार देशात 75 विभागीय प्रचारक असतील. दरम्यान, सध्यातरी या बदलांसाठी फक्त प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






