लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एकीकडे चालू वर्ष सरत आलेलं आहे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. बुधवारी सायंकाळी राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता. दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये खात्यात जमा होतील, असं सांगितलं जात होतं. काहींनी तर जानेवारी महिन्यात तिन्ही महिन्यांचे ४ हजार ५०० रुपये जमा होतील, असा अंदाज बांधला होता.
मात्र प्रत्यक्षात महिन्याच्या अगदी शेवटी सरकराने लाडक्या बहिणींना केवळ दीड हजार रुपयांवर खुश केलं आहे. एकीकडे डिसेंबर महिना भरुन पडलेला असताना केवळ नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिल्याने बहिणींचा काहीसा अपेक्षाभंग झाल्याचं दिसतंय. पण पैसे खात्यात आल्याने महिला तशा खुश आहेत.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर म्हणजे आज आहे. ज्या महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद होईल. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळते का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
४० लाख बहिणी अपात्र ठरणार?
योजनेच्या लाभार्थी महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र अनेक महिलांनी ई- केवायसी केलेली नाही. त्यामुळे ४० लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याची माहिती आहे. काही दिवसात याबाबत स्पष्टता मिळेल.






