Tuesday, February 10, 2026
Homeइचलकरंजीउदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर; उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित,...

उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर; उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित, आज होणार घोषणा

इचलकरंजी महापालिकेच्या (Ichalkaranji Corporation Election) पहिल्या महापौरपदासाठी (Ichalkaranji First Mayor) भाजपकडून उदय धातुंडे यांचे, तर उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित झाले आहे.

 

शुक्रवारी (ता. ६) याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे दाखल केला जाणार आहे. धातुंडे हे आमदार राहुल आवाडे यांचे कट्टर समर्थक आहेत, तर डाळ्या यांची माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे निकटवर्तीय अशी राजकीय क्षेत्रात ओळख आहे. दोघेही प्रथमच निवडून आले असून, भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला आहे. (first mayor of Ichalkaranji municipal corporation)

 

गेल्या काही दिवसांपासून वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण होणार, याबाबतची मोठी उत्सुकता होती. विशेषतः आवाडे आणि हाळवणकर गटातील इच्छुकांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती. ओबीसी प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित आहे. त्यानुसार या पदासाठी भाजपकडे २७ जण होते. त्यापैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क करण्यात येत होते. दररोज नवीन चेहऱ्याची चर्चा होती. सुरुवातीला हाळवणकर गटाकडून प्रदीप धुत्रे यांचे नाव आघाडीवर होते; पण आज सकाळी अचानकपणे महापौरपदासाठी आवाडे गटाच्या धातुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिला महापौर होण्याचा मान धातुंडे यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहात धातुंडे यांच्या मातोश्री नगरसेविका होत्या, तर यावेळी महापालिका निवडणुकीत स्वतः धातुंडे उभे होते. त्यांच्यासमोर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडून दिग्गज चेहरा असलेले राहुल खंजिरे होते. त्यांचा धक्कादायक पराभव करीत धातुंडे यांनी महापालिकेच्या पहिल्या सभागृहात प्रवेश केला आहे. ‘क्रिकेटपटू’ अशी वेगळी त्यांची ओळख आहे. सुरुवातीपासून आवाडे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. पक्षाच्या नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या धोरणामुळे त्यांचे नाव आघाडीवर आले आहे.

 

उपमहापौरपदासाठी हाळवणकर गटाचे अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित झाले आहे. माजी आमदार हाळवणकर यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. भाजपचे शहराध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. सध्या ते पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. शिव-शाहू विकास आघाडीतील प्रबळ चेहरा असलेल्या प्रकाश मोरबाळे यांचा धक्कादायक पराभव केल्यामुळे डाळ्या यांचे नाव निवडणूक निकालानंतर विशेष चर्चेत आले. त्यामुळे वस्त्रनगरीचा पहिला उपमहापौर होण्याचा मान त्यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

 

उमेदवारी अर्ज आज दाखल करणार

 

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (ता. ६) सकाळी प्रथम भाजपच्या नगरसेवक – नगरसेविकांची बैठक होईल. त्यामध्ये धातुंडे व डाळ्या यांच्या नावांची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे.

 

आवाडे गटाचे वर्चस्व

 

पहिल्या टप्प्यात महापौरपदावर हाळवणकर गटाला संधी दिली जाण्याची शक्यता होती; पण यावेळीही आवाडे गटाने हाळवणकर गटावर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हाळवणकर गटातील नगरसेवकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. महापौर निवडीच्या प्रक्रियेबाबत काही आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमातून जोरदार व्हायरल झाला आहे. त्याबाबतची शहरात जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -