कोल्हापूर जिल्ह्यातील ९९ हजार ६४ लाडक्या बहिणींनी केवायसी चुकीची भरल्याने त्यांना लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत. त्यांच्या नावाची यादी जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळाली असून, त्यांनी ती ग्रामपंचायतींना पाठवली आहे.
जोपर्यंत केवायसी दुरुस्त होणार नाही तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. याअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. ही रक्कम दर तीन महिन्यांनी मिळते. सुरुवातीला जिल्ह्यातील १० लाख ३० हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता. यासाठी वार्षिक अडीच लाखांच्या आतमध्ये उत्पन्नाची अट घातली गेली आहे.
राज्य शासनाने ज्या महिलांची केवायसी चुकली आहे, त्यांना परत केवायसी भरण्यास सांगितले. त्याची यादी जिल्हा महिला व बालविकास विभागाला पाठवली. जिल्ह्यातील ९९ हजार ६४ महिलांना परत केवायसी भरावी लागणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत, महापालिका यांना त्याची यादी पाठवण्यात आली असून, महिलांना संदेशही गेले आहेत. त्यामुळे आता जोपर्यंत या महिला केवायसी बरोबर अपलोड करत नाहीत तोपर्यंत त्यांना लाभ मिळणार नाही. केवायसी अंतर्गत महिलांना आधार कार्ड जोडावे लागणार आहे.
शासकीय वेतन आहे का?
महिलांना नव्याने केवायसी भरताना त्यांच्या कुटुंबामध्ये शासकीय नोकरी आहे का? किंवा त्यांच्या घरातील व्यक्तीला शासकीय निवृत्ती वेतन मिळते का? याचीही माहिती द्यावी लागणार आहे. तसेच कोणत्या अन्य योजनांचा लाभ घेतात का, याचीही माहिती द्यावी लागणार आहे.
ज्या महिलांची केवायसी परत भरण्याची सूचना आली आहे. त्यांनी ती तत्काळ भरावी. त्याशिवाय त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ३१ मार्च ही केवायसी दुरुस्त करण्याची अंतिम तारीख आहे.






