नाशिकच्या पेठ रोड परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका घराच्या छतावर चढत असताना खाली पडून शॉक लागल्याने एका सतरा वर्षीय युवकाचा करुण अंत झाला असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पेठ रोड परिसरात असलेल्या अश्वमेध नगर येथील पटांगणात खेळताना एका घरावर अल्पवयीन मुलगा चढला होता. याचवेळी या ठिकाणी असलेल्या विद्युत वाहिन्यांचा त्याला अंदाज न आल्याने त्याचा या विद्युत वाहिन्यांना स्पर्श झाला आणि शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भावेश गांगुर्डे असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या 17 वर्षीय युवकाचं नाव आहे.
पेठ रोड परिसरातील अश्वमेध नगर येथील मैदानात भावेश नेहमीप्रमाणे खेळत होता. याच ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळेमागे असलेल्या एका घरावर भावेश चढला. मात्र घरावर जात असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो जमिनीवर येऊन कोसळला. याचवेळी त्याच्या हाताचा स्पर्श उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला झाला आणि क्षणात त्याला शॉक लागल्याने तो लांब फेकला गेला. त्यामुळे त्याच्या हाताला गंभीर जखम झाली होती. विजेचा धक्का बसल्यानंतर भावेश हा बेशुद्ध पडला होता. ही घटना लक्षात येता आजूबाजूच्या नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. मयत भावेश याचे वडील संजय गांगुर्डे आणि परिसरातील रहिवाशी यांनी तत्काळ भावेश याला रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, या घटनेनं गांगुर्डे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






