‘महापालिकेत परिवहन सभापतिपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते; पण तिथे भाजपने युतीधर्म पाळला नाही. हे बरे नव्हे,’ अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महायुतीतील मित्रपक्षावर नाराजी व्यक्त केली.
अनौपचारिक बैठकीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. दरम्यान, मुंबईतील बैठकीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, हे ‘जनसुराज्य’ कसे सांगत आहे, असा सवाल करत आपली खदखदही त्यांनी व्यक्त केली.
महानगरपालिका, जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळ आदी निवडणुकासंदर्भात आज पत्रकारांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘महायुती म्हणून आम्ही महापालिका निवडणूक लढलो आहे. यानंतर कोणकोणती पदे कोणाला किती कालावधीसाठी द्यायचे हे ठरले आहे. त्यामुळे पहिले परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे होते. भाजपकडून याची स्पष्टोक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी शिवसेनेचा उमेदवार देऊन पहिले परिवहन समिती सभापतिपद शिवसेनेकडे दिले आहे. भाजपने युतीधर्म पाळला नाही. हे बरं नव्हे.’
ते पुढे म्हणाले, ‘जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे अध्यक्षपदही राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका कायम आहे. मुंबईतील बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला द्यावे, असे जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सांगण्यात आले. आमच्या पक्षाच्या विजयी उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अध्यक्षपद आम्हालाच पाहिजे, ही आमची भूमिका रास्त आहे. तीच मी त्या बैठकीत मांडली आहे. आता लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे नेते ही सर्व माहिती देणार आहोत.’
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीचा दरारा कमी झाल्यामुळे डावलले जात आहे, असा संदेश जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. ‘अजित दादा’ हे दादाच होते. त्यांच्या नसण्याने पक्षाची पर्यायाने महाराष्ट्राची हानी झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण जनतेसमोर आलेच पाहिजे, हीच आमचीही भूमिका आहे. आमदार रोहित पवार यांचीही भूमिका योग्य आहे.’
‘गोकुळ’चे राजकारण संस्था पातळीवरील
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये पक्षनिहाय जागा वाटप करावे, भाजपने नेतृत्व करावे, असे कोणी म्हणत असेल, तर ‘गोकुळ’ हा ‘पक्ष’ नव्हे तर ‘संस्था’ आहे हे समजून घ्यावे लागेल. गोकुळमध्ये जे सोबत येतील त्यांना सोबत घेतले जाईल, जे विरोधात असतील त्यांना विरोध केला जाईल. हे पक्षीय नव्हे, तर संस्था पातळीवरील राजकारण आहे. येथे सत्ता महायुतीचीच येईल.’ दरम्यान, आमदार सतेज पाटील सोबत असणार काय? या प्रश्नावर ‘ते आताच कसे सांगता येईल’, असेही मुश्रीफ म्हणाले.





