Thursday, April 2, 2026
Homeमहाराष्ट्रपावसात झाडाखाली थांबले अन् तिथेच काळाने गाठलं; दोन मित्रांचा वीज पडून मृत्यू!

पावसात झाडाखाली थांबले अन् तिथेच काळाने गाठलं; दोन मित्रांचा वीज पडून मृत्यू!

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तीन मित्र दर सोमवारप्रमाणे आपेगाव येथील श्री विज्ञानेश्वर दर्शनासाठी दुचाकीवर निघाले होते. मात्र, वाटेत आलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्यावर काळाचा घाला घातला.

 

पावसापासून वाचण्यासाठी नाथनगर वस्तीजवळ एका लिंबाच्या झाडाखाली थांबले असता, त्याच झाडावर वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

झाडाखालचा आसरा ठरला जीवघेणा

गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय २०, दोन्ही रा. महाकाळा, ता. अंबड) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेला समर्थ भगवान वाघमारे हा तरुण वीज पडल्याने गंभीररीत्या भाजला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्तीजवळ हे तिघेही पावसापासून वाचण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली थांबले होते, त्याच वेळी ही निसर्गाची वीज त्यांच्या अंगावर कोसळली.

 

विज्ञानेश्वराचे दर्शन राहिले अधुरे

हे तिन्ही तरुण दर सोमवारी श्रद्धेने आपेगावच्या विज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असत. आजही ते त्याच भक्तीभावाने निघाले होते, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. पावसाने गाठल्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवून झाडाचा आधार घेतला, पण तोच आधार त्यांच्यासाठी शेवटचा ठरला. या तरुणांचे विज्ञानेश्वराचे दर्शन घेण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

 

पोलिसांकडून पंचनामा आणि मदतकार्य

घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. अवकाळी पावसाने जालन्यात पुन्हा एकदा बळी घेतल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -