Tuesday, April 21, 2026
Homeमहाराष्ट्रनियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांतच काळाचा घाला, नव्या नवरा -...

नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांतच काळाचा घाला, नव्या नवरा – नवरीचा मृत्यू

एकीकडे संसाराची नवी स्वप्ने डोळ्यांत साठवून आयुष्याची नवी सुरुवात झाली होती तर दुसरीकडे नियतीने अत्यंत क्रूरपणे स्वप्नांचा चक्काचूर केला. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे गावच्या हद्दीत झालेल्या एका भीषण अपघातात अवघ्या दहा दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

 

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील राजू झोरे (वय 25) आणि त्यांची पत्नी राणी झोरे (वय 23) हे दोघे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. येरफळे गावच्या हद्दीत एका ट्रकल्या ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढचे चाक निखळून लांब पडले तर पिकअप गाडीच्या समोरील काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

अवघ्या 10 दिवसांपूर्वी झाला होता विवाह

 

 

राजू आणि राणी यांचा विवाह अवघ्या 10 दिवसांपूर्वी झाला होता. नवऱ्या मुलीाच्या हातावरची मेहंदीही उतरली नव्हती तोच काळाने या जोडीवर झडप घातली. एका क्षणात हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. अपघाताची बातमी समजताच सडादाढोली गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरातून दहा दिवसांपूर्वी सनई-चौघड्यांच्या सुरात वरात निघाली होती, तिथेच आज या पती-पत्नीचे पार्थिव पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

ओव्हरटेकिंगच्या नादात गेला जीव

 

 

हा अपघात ओव्हरटेकिंगच्या नादात झाल्याचे प्राथमिक दर्शनी समोर येत आहे. महामार्गावर वाहनांचा वाढता वेग आणि नियम धाब्यावर बसवून केली जाणारी ओव्हरटेकिंग निष्पाप जीवांच्या जीवावर बेतत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कराड-चिपळूण मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -