केंद्र सरकारकडून यंदा देशाची १६ वी जनगणना केली जात आहे. ही जनगणना विशेष असून यावेळी ‘डिजिटल सेन्सस’ आणि ‘स्व-गणना’ ही सुविधा प्रथमच उपलब्ध करून दिली. जनगणनेमध्ये नोंदीची चिंता असल्यास आता काळजी करण्याची गरज नाही.
आपण स्वत:च स्व-गणना घरबसल्या करू शकतो.
स्व-गणना म्हणजे काय? प्रत्यक्ष सहभागी होता येणार का?
आपण स्वतः आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकतो. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक यापैकी एकाच्या आधारे लॉगिन करावे लागेल. https://se.census.gov.in/ या पोर्टलवर स्व-गणना कालावधी हा महाराष्ट्र राज्यासाठी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सामान्य नागरिकांना स्व-गणना करुन जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणे शक्य होईल. १ एप्रिलपासून अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, दिल्ली, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोरम, ओडिसा आणि सिक्कीम राज्यात स्व-गणना सुरू झाली आहे. विविध टप्प्यांमध्ये देशभर ही मोहीम राबवली जाणार आहे.
१६ मेपासून गृहभेटी; जनजगणना पुढील १० वर्षांसाठी ठरणार दिशादर्शक
जे नागरिक तंत्रज्ञान वापरू शकत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांच्यासाठी प्रशिक्षित प्रगणक १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन ॲपद्वारे माहिती नोंदवतील. जनगणनेतून मिळालेली आकडेवारी पुढील १० वर्षांसाठी शाळा, दवाखाने, रस्ते, राशन, पाणीपुरवठा, रोजगार योजना यांचे नियोजन करण्यात उपयुक्त ठरेल. त्यामुळे अचूक जनगणना होणे आवश्यक आहे.
दोन हजार ३३८ घर यादी गट
जनगणनेच्या कार्यासाठी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका शहरी क्षेत्रात एकूण दोन हजार ३३८ घर यादी गट बनविण्यात आले. एक घर यादी गट हा जवळपास १८० ते २०० घरे किंवा ६५० ते ८०० लोकसंख्येपासून तयार केला जातो. यासाठी एकूण दोन हजार ६१४ प्रगणक तसेच प्रत्येक सहा प्रगणकांसाठी एक याप्रमाणे एकूण ४२६ पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण २३ एप्रिलपासून ८ मे या कालावधीत अधिकृत अधिकारी स्तरावर घेण्यात येणार आहे.


