Tuesday, April 28, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 'माझ्या मुलाला फाशी द्या..'; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे शोषण, शाहिद...

कोल्हापूर : ‘माझ्या मुलाला फाशी द्या..’; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे शोषण, शाहिद सनदीच्या वडिलांनी मागितली गावकऱ्यांची माफी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि अमरावतीतील परतवाडा येथील अयान प्रकरणानंतर राज्यभरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत (Kolhapur Crime News) असतानाच, कोल्हापुरातही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरातील एका तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद समीर सनदी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो फार्मसीचे शिक्षण घेत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २२ वयोगटातील तरुणींशी ओळख वाढवत होता. मैत्री आणि प्रेमाच्या नावाखाली त्यांना विश्वासात घेऊन लॉजवर नेत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

 

त्यानंतर संबंधित तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाची सुरुवात राजारामपुरी पोलिस ठाण्यात एका २० वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर झाली.

 

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाहिद सनदी याला अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात शिरोली, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील आणखी काही तरुणी या जाळ्यात अडकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

तपासादरम्यान आरोपीने अनेक तरुणींचे व्हिडिओ तयार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आरोपीचा एक मित्र फरार असून, त्याच्याकडेही काही आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून संबंधित डिजिटल पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

हिंदू-मुस्लिम समाजाकडून निषेध

 

या घटनेनंतर पुलाची शिरोली गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. निषेध म्हणून गाव बंदही पाळण्यात आला.

 

“माझ्या मुलाला फाशीची शिक्षा द्या”

 

दरम्यान, या प्रकरणात आरोपीच्या वडिलांनीही मुलाच्या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे. “माझ्या मुलाने केलेल्या कृत्याला आमचा कोणताही पाठिंबा नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा झाली तरी हरकत नाही,” असे सांगत त्यांनी गावकऱ्यांची माफी मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -