Met Gala 2026 या फॅशनच्या सर्वात मोठ्या मंचावर यंदा ईशा अंबानी हिने आपल्या कलात्मक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय परंपरा, शिल्पकला आणि आधुनिक कुट्योर यांचा अप्रतिम संगम तिच्या वेशभूषेत पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, आई निता अंबानीच्या दागिन्यांचा वापर, निजामकालीन सरपेच आणि 150 तासांत तयार झालेला खास गजरा यांसारख्या घटकांनी तिचा लूक अधिकच उठावदार बनवला.
ईशाने परिधान केलेली साडी प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी खास तयार केली होती. ही साडी खऱ्या सोन्याच्या धाग्यांनी विणलेली असून, ती तयार करण्यासाठी 50 कारागिरांनी 1200 तासांहून अधिक मेहनत घेतली. साडीवर पिछवाई पेंटिंगपासून प्रेरित डिझाइन्स, हँड-पेंटिंग आणि नाजूक भरतकाम यांचा वापर करून भारतीय वस्त्रपरंपरेची झलक दाखवण्यात आली.
तिचा ब्लाउजही तितकाच आकर्षक होता. 200 ओल्ड कट डायमंड्सने सजवलेला हा डीप नेक ब्लाउज सुमारे 1800+ कॅरेट वजनाचा असून, तो तयार करण्यासाठी जवळपास 2000 तास लागले. या ब्लाउजवर निजाम कलेक्शनमधील ऐतिहासिक सरपेच लावण्यात आला होता, ज्यामुळे त्याला शाही लुक प्राप्त झाला. या ब्लाउजची किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
ईशाच्या लूकमधील आणखी एक खास आकर्षण म्हणजे तिचा गजरा. सौरभ गुप्ता यांनी 150 तासांत तयार केलेला हा गजरा पारंपरिक फुलांचा नसून पेपर, कॉपर आणि ब्रासपासून बनवलेला होता. मोगऱ्याच्या गजऱ्यासारखा दिसणारा हा हेअर अॅक्सेसरी तिच्या केसांमध्ये फ्लोअर-लेंथ स्टाइलमध्ये सजवण्यात आला होता.




