मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेत राहिलेला ‘देऊळ बंद’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता तब्बल काही वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग ‘देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे.
टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली आहे. आध्यात्मिकता, श्रद्धा आणि वास्तव यांचा संगम असलेला हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
टीझरची सुरुवात एका शांत नदीकाठच्या दृश्याने होते. एका वटवृक्षाजवळ पाठमोरी बसलेली महिला हातात दगड घेऊन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी काहीतरी विचार करताना दिसते. त्या वातावरणात एक संवाद ऐकायला मिळतो — “मनापासून बोलवलं की देव येतो.”
यानंतर कथेला अचानक वेगळं वळण मिळतं. ती महिला वारुळावर दगड फेकते आणि त्यानंतर स्वामी समर्थ प्रकट झाल्याचं दाखवलं आहे. पुढे स्वामी आणि त्या महिलेतील संवाद टीझरचा मुख्य आकर्षण ठरत आहे.
“अरे बापरे, इथेही देऊळ बंदच का?” हा संवाद सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे एका ठाम आणि प्रश्न विचारणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसत आहेत, तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत प्रसाद ओक, महेश मांजरेकर, अतुल कुडाळे यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
टीझरमध्ये श्रद्धा विरुद्ध वास्तव, देवावरचा विश्वास आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे शेतकरी आणि समाजातील वास्तव प्रश्नांनाही या कथेत स्पर्श करण्यात आल्याचं दिसत आहे.
‘देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.



