Sunday, May 10, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी: पत्नी, दोन मुलांनी मिळून केला माजी सैनिकाचा खून, कबनूरमध्ये घटना

इचलकरंजी: पत्नी, दोन मुलांनी मिळून केला माजी सैनिकाचा खून, कबनूरमध्ये घटना

इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर एका माजी सैनिकाचा पत्नी आणि दोन मुलांनी मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. धारदार शस्त्राने पाठीत खोलवर वार झाल्याने बाळू बापू बामणे (वय ५८, रा.शिवाजी कॉर्नर, कबनूर) यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला पत्नी आणि मुलाकडून हा मृत्यू काचेच्या टेबलावर पडल्याने झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्क तपासामुळे खून उघडकीस आला.

 

याप्रकरणी अमोल गणपती बामणे (३७, रा. सहारानगर, रुई, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नी सुनीता बाळू बामणे (४५) तसेच मुले यश बाळू बामणे (२०) आणि ओम बाळू बामणे (२३) या तिघांना अटक केली आहे. त्यांना चार दिवसांची कोठडी मिळाली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः बाळू बामणे दारूच्या नशेत पत्नी व मुलांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करत होते. सततच्या त्रासाचा राग मनात धरून तिघांनी संगनमताने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

घरात गुरुवारी (ता. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास वाद झाला. त्यावेळी तिघांनी मिळून बामणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पाठीवर धारदार चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तिघांनी प्रथम एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून आयजीएम रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

 

तिघांनी पोलिसांसमोर दारूच्या नशेत काचेच्या टेबलावर पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, मृताच्या पाठीवरील खोल जखमा पाहून पोलिसांना संशय आला. गुन्हा शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घरात रक्ताचा सडा, रक्ताने भिजलेले अंथरूण असे स्पष्ट पुरावे मिळाले. यानंतर पोलिसांनी तिघांची स्वतंत्र चौकशी केली तेव्हा खुनाची कबुली दिली. पोलिसांनी चाकू जप्त केला. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. निरीक्षक शिवाजी गायकवाड तपास करत आहेत.

 

रक्ताचा सडा पुसला, हत्यार लपवले

 

खुनानंतर आईसह दोन्ही मुलांनी रक्ताचा सडा पुसून खोली स्वच्छ केली. खुनासाठी वापरलेला धारदार चाकू घरापासून काही अंतरावरील निर्जन ठिकाणी लपवून ठेवला. मात्र, तपासात हा सारा प्रकार उघड झाला, असे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -