गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात 12 मे रोजी सनरायझर्स हैदराबादचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवत सलग पाचवा आणि एकूण आठवा सामना जिंकला. गुजरातने हैदराबादसमोर 169 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांसमोर हैदराबादला 15 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने हैदराबादचा 14.5 ओव्हरमध्ये 86 रन्सवर बाजार उठवला. गुजरातचा हा धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. तर हैदराबादचा धावांबाबत सर्वात मोठा पराभव ठरला. गुजरात या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 टीम ठरली आहे. तर पराभवामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.
गुजरात आणि हैदराबाद यांच्यातील विजेता संघ पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 होणार हे स्पष्ट होतं. हैदराबादला माफक आव्हान मिळालं होतं. मात्र हैदराबादने सामन्यासह 2 गुणही गमावले आणि नंबर 1 होण्याची संधीही गमावली. हैदराबादला या पराभवाचा पॉइंट्स टेबलमध्ये फटका बसला आहे. तसेच आता हैदराबादचं प्लेऑफचं समीकरण काहीसं किचकट होऊन बसलंय.
गुजरात नंबर 1
गुजरात 2 संघांना मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 ठरली आहे. गुजरातने हैदराबाद आणि गतविजेत्या आरसीबीला पछाडत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. या विजयासह गुजरातच्या खात्यात 12 सामन्यानंतर 16 गुण झाले आहेत. गुजरातचा नेट रनरेट हा सामन्याआधी +0.228 असा होता तो विजयानंतर +0.551 असा झाला आहे. तर आरसीबीची दुसऱ्या आणि हैदराबादची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
हैदराबादचं पराभवानंतर प्लेऑफचं गणित बिघडलं
आरसीबीच्या खात्यात 11 सामन्यानंतर 14 गुण आहेत. तर हैदराबादच्या नावावर 12 सामन्यानंतर 14 गुण आहेत. तर हैदराबादला 5 वेळा पराभूत व्हावं लागलंय. गुजरात 16 गुणांनंतरही प्लेऑफसाठी पात्र झालेली नाही. त्यामुळे हैदराबादला प्लेऑफसाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे हैदराबादचा उर्वरित 2 सामन्यांत चांगलाच कस लागणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
बुधवारी कुणाचा सामना?
दरम्यान बुधवारी 13 मे रोजी आणखी एक जबरदस्त सामना होणार आहे. या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. आरसीबीसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे. तर केकेआर सामना जिंकून आरसीबीचं टेन्शन वाढवू शकते. त्यामुळे या सामन्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे.




