Monday, May 18, 2026
Homeआरोग्य६० दिवस साखरेपासून दूर राहिलात तर शरीरात नेमकं काय घडतं? शरीर देतं...

६० दिवस साखरेपासून दूर राहिलात तर शरीरात नेमकं काय घडतं? शरीर देतं वेगळेच संकेत; फायदे पाहून बसणार धक्का!

आजच्या धावपळीच्या जीवनात साखर आपल्या रोजच्या आहाराचा एक मोठा भाग बनली आहे. सकाळच्या चहापासून ते बिस्किटं, थंड पेयं, मिठाई, पॅकेज्ड फूड आणि स्नॅक्सपर्यंत अनेक पदार्थांमध्ये नकळत मोठ्या प्रमाणात साखर मिसळलेली असते.

 

अनेकांना तर दिवसातून किती साखर शरीरात जाते, याची कल्पनाही नसते. पण जर तुम्ही अचानक ठरवलं की, पुढचे ६० दिवस साखरेपासून पूर्णपणे दूर राहायचं… तर शरीरात नेमकं काय घडू शकतं?

 

सध्या सोशल मीडियावर आणि फिटनेस जगतात ‘No Sugar Challenge’ची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण ३० ते ६० दिवस साखर सोडल्यावर शरीरात झालेले बदल शेअर करीत आहेत. काहींना वजनात फरक जाणवला, तर काहींनी त्वचा, झोप व ऊर्जा यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचं सांगितलं. त्यामुळेच आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, खरंच साखर बंद केल्यानं शरीरात एवढा बदल होऊ शकतो का?

 

सुरुवातीचे काही दिवस ठरू शकतात कठीण

 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सुरुवातीचे तीन ते सात दिवस काही लोकांसाठी थोडे आव्हानात्मक ठरू शकतात. वारंवार गोड खाण्याची इच्छा होणं, चिडचिड, डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. यालाच ‘शुगर विड्रॉल’ असं म्हटलं जातं. कारण- शरीर अचानक कमी झालेल्या साखरेला सरावत असतं.

 

मात्र, पहिला आठवडा पार झाल्यानंतर अनेकांना शरीर अधिक हलकं आणि ऊर्जावान वाटू शकतं. वारंवार थकवा येणं कमी होऊ शकतं आणि दिवसभर ऊर्जा स्थिर राहण्यास मदत मिळू शकते.

 

वजन कमी होण्यास मदत मिळू शकते

 

साखरेमध्ये भरपूर प्रमाणात उष्मांक असतात. जास्त साखर खाल्ल्यानं शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढते. ६० दिवस साखर टाळल्यास शरीर साठवलेली चरबी ऊर्जेसाठी वापरू लागते, असं काही तज्ज्ञ मानतात. त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

 

त्वचेवर नैसर्गिक तजेला

 

जास्त साखर खाल्ल्यानं त्वचेतील कोलाजनवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर मुरमे, निस्तेजपणा किंवा सुरकुत्या दिसू शकतात. यालट काही लोकांच्या अनुभवांनुसार, साखर कमी केल्यानंतर त्वचा अधिक स्वच्छ, चमकदार व तजेलदार दिसू लागते.

 

हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर

 

अत्याधिक साखर सेवनामुळे शरीरात सूज वाढण्याची शक्यता असते. तसेच रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल यातही वाढ होऊ शकते. याउलट साखर कमी केल्यानं शरीरातील काही प्रक्रिया संतुलित राहण्यास मदत होऊ शकते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं.

 

झोप आणि मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो परिणाम

 

काही संशोधनांनुसार, जास्त साखरेच सेवनामुळे मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. वारंवार मूड बदलणं, लक्ष केंद्रित न होणं किंवा अस्वस्थ वाटणं अशा समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात. साखर कमी केल्यानंतर काही लोकांना अधिक शांत झोप लागते, लक्ष केंद्रित करणं सोपं होतं आणि मन अधिक शांत वाटू शकतं.

 

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मात्र, साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं हे आरोग्यासाठी फायदेशीर पाऊल ठरू शकतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -