गुंड प्रवृत्तीच्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याने सोमवारी मध्यरात्री हातात शस्त्रे घेऊन गंजीमाळ परिसरात धुडगूस घातला.त्या टोळक्याने परिसरातील २५ हून अधिक वाहनांची बेफाम तोडफोड केली. सतरा ते अठरा जणांच्या टोळीने एडके, तलवारी, गज घेऊन हल्ला करीत दहशत माजविली. या दहशतीने परिसरातील नागरिक भयभीत झाले.
शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयाबाहेर सहा महिन्यांपूर्वी तरुणांच्या दोन गटांत भांडण झाले होते. त्या रागातून हा तोडफोडीचा प्रकार घडला. मात्र याच्याशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या कष्टकरी लोकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दिसेल ती वाहने लक्ष्य
संशयित टोळक्याने गंजीमाळ चौक ते जय भीम मित्र मंडळ या मार्गावरील दिसेल त्या वाहनांना लक्ष्य केले. यामध्ये दहा ते पंधरा मोटारी, दुचाकींची तोडफोड केली. सिद्धेश कांबळे व त्याचे मित्र याच परिसरातील जुना शेतकरी बाजार परिसरात असल्याची माहिती मिळताच या टोळक्याने तेथे जाऊनही वाहनांची तोडफोड केली.
पोलिसांनी याप्रकरणी रुद्र सनी लोकरे, आरबाज बिजली, स्वराज्य उर्फ गब्बर स्वप्नील मोरे याच्यासह सतरा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील आकाश संजय मासाळ, संतोष देवीदास मोटे, अजय नागेश डोलारी, सौरभ शिवाजी पाटील, स्वराज मोरे, नावीद सनी मकानदार, शैलेश धनावडे या सात संशयितांना अटक केली आहे.
याबाबत जुना राजवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः राजाराम चौकातील विशाल थोरात व रणवीर थोरात यांचा डिसेंबर २०२५ मध्ये जवाहरनगरातील तरुणांशी वाद झाला होता. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून रुद्र लोकरे, आरबाज बिजली, स्वराज मोरे उर्फ गब्बर यांनी भांडण केले होते. गंजीमाळ येथील सिद्धेश कांबळे हा थोरात याच्यासोबत फिरत असल्याच्या राग आरबाज बिजलीसह इतरांच्या मनात होता.
संशयितांची धरपकड…
मध्यरात्री दोनच्या सुमारास याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील तरुणांकडून भांडणाचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. सीसीटीव्ही आधारे हल्लेखोरांची नावे निष्पन्न करून धरपकडही सुरू केली. पहाटे चारपर्यंत प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते. त्या दरम्यान पंचनामा करण्यात आला.
मध्यरात्री अचानक हल्ला….
तेजस कांबळे, मुस्ताक नाकाडे गंजीमाळ येथील जयभीम तरुण मंडळाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास बसले होते. आरबाज बिजली याने नाकाडेकडे फोनवरून सिद्धेश कांबळे कोठे आहे, अशी विचारणा केली. मध्यरात्री बाराच्या सुमारास रुद्र लोकरे काही तरुणांसोबत तेथे आला. एडक्याने सिद्धेश कांबळे याच्यावर वार केला. यामध्ये सिद्धेश जखमी झाल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास सुभाषनगर, जवाहरनगरातील टोळक्याने गंजीमाळ, हनुमान तालीम, जयभीम तरुण मंडळ परिसरात घुसून तोडफोड सुरू केली.





