अमेरिकन सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने काही तासांतच होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे जगभरात घबराट पसरली असून खनिज तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली.
गेल्या दोन दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दरात जवळपास पाच टक्क्यांची वाढ दिसून आली. पार्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा होर्मुझचा जलमार्ग जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यामुळे हा जलमार्ग बंद राहिल्यास पुढील काही दिवसांत तेलाचे दर आणखीनच भडकण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भारतावरही अत्यंत गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून दैनंदिन जीवनाशी निगडित ७ महत्त्वाच्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, त्याविषयी…
होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी का महत्वाची?
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे ८८ टक्के तेल परदेशातून आयात करतो. त्यापैकी जवळपास निम्मा पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या तेलावर अवलंबून असतो. याशिवाय, भारतातील घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा ६० टक्क्यांहून अधिक पुरवठा याच मार्गावरून आयात केला जातो. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढल्यास देशात इंधनाची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वाढत्या इंधन खर्चामुळे वाहतूक, उत्पादन आणि वितरण खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे खनिज तेलाच्या किमती वाढत राहिल्यास दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
१) गॅस सिलिंडरच्या किंमती वाढणार?
या आंतरराष्ट्रीय संकटाचा सर्वाधिक मोठा परिणाम भारतातील गॅस सिलिंडरच्या दरावर होऊ शकतो. भारत आपल्या एलपीजी गरजेचा मोठा हिस्सा परदेशातून आयात करतो आणि त्यातील बहुतांश पुरवठा आखाती देशांमधून होतो. होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे कायम राहिल्यास देशाच्या आयात खर्चात मोठी वाढ होऊ शकते. परिणामी, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती आणि अनुदान व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.





